नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई मनपा परिवहनकडून शहरात विविध ठिकाणी बसथांबे उभारले गेले. या बसथांब्यांचा वापर भिकारी, बेघर नागरिक व मद्यपी दुपारच्या वेळी वामकुक्षीसाठी करीत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटी आणि बेस्ट बसेसची विविध बसथांब्यांवर वाट पहावी लागते. म्हणून आरामदायी बसथांब्यांची परिवहन उपक्रमाकडून निर्मिती करण्यात आली आहे, परंतु काही बसथांब्यांमध्ये प्रवाशांऐवजी मद्यपी, भिकारी आरामात वामकुक्षी घेत असलेले दिसत असतात. प्रवासी त्यांना उठवायला गेल्यास ते उठत नाहीत. त्यांना मज्जाव केल्यास प्रवाशांवरच धावून जातात. प्रवासी मात्र त्यांच्याशी वाद न घालता बसथांब्यावर उभे राहणे पसंत करीत आहे.
असे प्रकार नेरुळमधील बांचोली बस स्थानक, सेक्टर तीन डेपो, सारसोले स्थानक आदी ठिकाणी सर्रास पहावयास मिळत आहे. या आराम करणार्यांंवर परिवहन उपक्रमाने कारवाई करावी तसेच काही बसथांब्यांवर सुरक्षारक्षक तैनात करावेत, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
बसथांब्यांमध्ये आराम करणारे नागरिक जागा अडवत असतील तर त्यावर कारवाई करण्यास परिवहनच्या भरारी पथकास सांगितले जाईल.
-योगेश कडूस्कर, व्यवस्थापक, परिवहन उपक्रम, नवी मुंबई