खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
खबर्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड पथकाने शुवक्रवारी (दि. 25) गांजा विक्री करणार्या हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला, (वय 32 रा. आशियाना बिल्डींग, खोपोली बाजारपेठ) याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा किलो वजनाचा 76 हजार 700 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पथकातील पोलीस हवालदार राजेश पाटील यांना मुळगाव खोपोली गावच्या हद्दीत एक जण कारमधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकूर, सहाय्यक फौजदार देवराम कोरम, पोलीस हवलदार राजेश पाटील, अमोल हंबीर, प्रशांत दबडे, विकास खैरनार यांचे पथक दबा धरून बसले होते. आरोपी हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला त्याच्या कारसह घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गाडीमध्ये 6.394 किलो ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. चौकशीमध्ये हमजाने गांजा स्थानिक पातळीवर विक्री करण्यासाठी आणला असल्याची प्राथमिक माहिती दिली. हमजा याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.