राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध
अलिबाग : प्रतिनिधी
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महसूल कर्मचार्यांनी सोमवारी (दि. 28) राज्य सरकारविरोधात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. या वेळी संपकरी कर्मचार्यांनी रक्तदान करून आपला निषेध नोंदवला. रायगड जिल्ह्यातील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच तहसील, भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, शिपाई मिळून 450 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्याने त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया रद्द करावी, अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती झाल्यानंतर त्यांना त्या त्या विभागातच पदस्थापना देण्यात यावी, नायब तहसीलदारांची तसेच महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, दांगट समितीने दिलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करावीत, महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावीत, प्रधानमंत्री किसान योजनेसाठी स्वतंत्र पदनिर्मिती करावी, वैद्यकीय कॅशलेस सुविधा राबवण्यात यावी, संघटनेच्या पदाधिकार्यांना बदलीमध्ये संरक्षण मिळावे, महसूल दिन राज्यस्तरावर साजरा व्हावा व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध मागण्या प्रलंबित असून त्या तातडीने मान्य कराव्यात अशा संपकरी कर्मचार्यांंच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचार्यांनी दिला आहे.
राज्य सरकारचा निषेध म्हणून संपकरी कर्मचार्यांनी सोमवारी अलिबाग तसेच महाड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी सर्व कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून निदर्शने केली. नेहमी गजबजलेल्या कार्यालयात सोमवारी वर्दळ कमी होती.
खालापूरातही महसूल कर्मचार्यांचा संप
खोपोली : प्रतिनिधी
खालापूरातील 42 महसूल कर्मचार्यांनी रक्तदान करून शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत सोमवारी (दि. 28) संप पुकारला होता. राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारला होता.
राज्यात महसूल विभागात महसूल सहाय्यकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एका महसूल सहाय्यकाला दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील होत असलेल्या दुर्लक्षामुळे सध्याच्या कर्मचार्यांवर ताण येत आहे. याशिवाय अव्वल कारकून, मंडळ अधिकारी या संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत, या व इतर मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे महसूल कर्मचारी संघटनेने संपाचे हत्यार उपसले.
कोकण विभागीय महसूल समन्वय समितीचे सरचिटणीस विजय पुजारी, रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष केतन भगत, कार्याध्यक्ष गोवर्धन माने, सरचिटणीस भुषण पाटील, कोषाध्यक्ष वृषाली निंबरे यांच्यासह महसूल कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
रायगड जिल्ह्यात सुमारे 100च्या आसपास महसूल सहाय्यक पदे रिक्त आहेत. कामाचा अतिरिक्त ताणामुळे कर्मचारी तणावात आहेत. शासनाने मागण्या मान्य न केल्यास चार एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहोत. -विजय पुजारी, सरचिटणीस,कोकण विभागीय महसूल समन्वय समिती