देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार
नवी मुंबई : बातमीदार
देशाचे पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट मांडला. त्यांनी खासदार आमदारांना गावे दत्तक घेण्याचे सांगितले. ही संकल्पना सगळ्यात चांगली राबवली ती आमदार मंदा म्हात्रे यांनी. हे दिवाळे गावाला मिळणार्या सुविधांमुळे दिसून येत आहे. मंदाताई आपण जेव्हा या ’स्मार्ट दिवाळे’ गावाचे उद्घाटन कराल तेव्हा मोदींजींचा संदेश आपल्या पडद्यावर नक्कीच झळकेल, असे आश्वासन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देत आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले. नवी मुंबईतील दिवाळे गाव या पहिल्या स्मार्ट व्हिलेजचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा हे आमदार मंदा म्हात्रें यांच्याकडून शिकावे. त्या कधीही स्वहिताचे काम घेऊन आमच्याकडे आल्या नाहीत. त्यांनी नवी मुंबईत जेट्टी व्हिजन राबवले. त्यांच्यामुळे प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना प्रत्येकी सहा लाख रुपये मिळाले. यापूढे राज्यात कोठेही मच्छीमार बाधित झाल्यास त्यांना इतकी रक्कम द्यावी लागणार आहे. त्याचे श्रेय आमदार म्हात्रे यांना जाते. स्मार्ट व्हिलेजमध्ये त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात नवी मुंबईचा विकास झाल्याचे फडणवीस म्हणाले.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे, आमदार गणेश नाईक यांची भाषणे झाली. आमदार रमेश पाटील, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी, पंढरीनाथ पाटील, निलेश म्हात्रे, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, राजेश राय तसेच भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार गणेश नाईकांनी मविआ सरकारला व पालिका अधिकर्यांना टोला लगावला. अनेक अधिकारी हे मंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला., मात्र सत्ता बदलत असते असा इशारा आमदार नाईक यांनी या वेळी अधिकर्यांना दिला.