मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील आंबोली धरणाच्या उजव्या व डाव्या तीर कालव्यांची कामे सात वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद आहेत. त्यामुळे हजारो लाभार्थी शेतकरी नाराज आहेत.
लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले आंबोली धरण मुरूडपासून सहा किमी अंतरावर असून या मातीच्या धरणाची लांबी 518 मीटर, उंची 32.09 मीटर आहे. आंबोली धरण प्रकल्पासाठी 29 कोटी रुपये खर्च झाला आहे. या धरणातून मुरूड शहराला पाणी पुरवठा केला जातो. तसेच या धरणातील पाण्यावर परिसरातील 22 गावांतील 616 हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार होती. त्यासाठी धरणापासून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढण्यात येणार होते. मात्र या दोन्ही कालव्यांचे काम जून 2015 पासून बंद आहे. त्यामुळे 7.10 किमी लांबीच्या उजव्या तीर कालव्याचे 6.10 किमी लांबीचे काम अपुर्ण आहे. तर डाव्या तीर कालव्याचे 2.64 किमी पैकी 1.64 किमी काम अपुर्ण आहे.
आंबोली धरणाच्या दोन्ही कालव्यांचे काम पुर्ण झाल्यास मुरूड तालुक्यातील गोयगान, उंडरगाव, बौद्धवाडी, जोसरांजण, वाणदे, शिघ्रे, छोटी अंबोली, खार आंबोली व तेलवडे, माझेरी, गोलघुमट आदि 22 गावांतील शेतकर्यांना भाताचे दुबार पीक त्याचप्रमाणे भाजीपाला उत्पादन घेण्यास मदत होणार आहे. मात्र आजतागात या कालव्यांची कामे पूर्ण न झाल्यामुळे शेतकर्यांना दुबार शेतीचा फायदा घेता आलेला नाही.