मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर असून येथे विविध उद्योगधंदे आहेत. परीसरात शासकीय कार्यालय, सुख सोयीयुक्त पिल्लई इंटरनॅशनल महाविद्यालय, सेबी प्रकल्प, जवळूनच गेलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आदींमुळे रसायनी व परिसराचा नावलौकीक आहे. परंतु येथील रसायनी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत असून स्थानकात योग्य सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.
या स्थानकावर दिवा-मुंबई, रत्नागिरी, गोव्याच्या दिशेने येणार्या रेल्वे गाड्या थांबा घेतात. तर नुकताच सुरु झालेली दिवा-पेण मेमु ट्रेन दिवसात चारवेळा रसायनी रेल्वे स्थानकावर थांबते. रसायनी परीसरात पिल्लई इंटरनॅशनल कॉलेज असल्याने कॉलेजात शिक्षण घेणारे बरेचशे विद्यार्थी रेल्वेने प्रवास करतात. शिवाय रेल्वेने प्रवास करुन कामानिमित्त येणारा कामगारवर्गही मोठा आहे. रसायनी स्थानकावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तर पावसाळ्यात भिजत गाडीची वाट पाहावी लागते. शिवाय प्रवाशांना बसण्यासाठी स्थानकावर बाकड्यांचीही व्यवस्था नसल्याने ताटकलत उभे रहावे लागत असतानाचे चित्र पहावयास मिळते. तसेच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था स्थानकात नसल्याने काही अंतरावर पायवीट करत जावे लागते. रेल्वे तिकीट घरही स्थानकापासून काही अंतरावर असून प्रवासी तिकीट घेऊन येईपर्यंत रेल्वे गाडी जाण्याची वेळ येते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकाच्या फळाटालगत वाढलेल्या गवताचा मुक्त संचार दिसून येतो. तसेच ध्वनीक्षेपक आणि माहिती यांचा मागमूसही या स्थानकातून प्रवाशांना कधीच ऐकायला मिळाला नसल्याचे प्रवाशी सांगतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकांकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.