पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडको अग्निशन दलात नव्याने दाखल झालेल्या चार अत्याधुनिक फायर इंजिनचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, लोकेश चंद्र यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली व यांसह सिडकोतील विभाग प्रमुख उपस्थित होते. सिडको अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल झालेल्या अत्याधुनिक फायर इंजिनमुळे अग्निशमनाचे काम अधिक प्रभावीरित्या करता येणार आहे. यामुळे आपत्ती नियंत्रण व्यवस्थाही अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. यासोबतच सिडको अग्निशमन दलातील जवानांना 135 फायर सूटचे वाटप करण्यात आले आहे. आधुनिक दर्जाच्या अग्निरोधक फायर सूटमुळे अग्निशमन जवानांचेही आगीच्या ज्वाळांपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे. लवकरच सिडकोच्या अग्निशमन दलात 2 वॉटर टँकर व बावीसाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणारी 70 मीटरची शिडीही (एरियल लॅडर) दाखल होणार आहे. सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेचे बळकटीकरण व विस्तारीकरण करण्याबरोबरच जवानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील सिडकोतर्फे उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.