Breaking News

एक लाखासाठी आईने पोटच्या मुलाला विकले; पनवेल पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत आरोपी गजाआड

पनवेल ः संजय कदम

‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मुलाला विकल्यानंतर स्वत: आईनेच पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना झाली, पण मुलाला पळवून नेणारे दाम्पत्य हे पनवेल तालुक्यातील बोर्ले या गावात वास्तव्यास असल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता, अथक परिश्रम करून अवघ्या दोन तासांत या मुलाला आठ आरोपींसह ताब्यात घेऊन त्यांना कोथरुड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. कोथरुड, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यामार्फत नऊ तपास पथकांमार्फत चिमुरड्याचा शोध सुरू होता. अपहरण झालेला मुलगा त्याच दिवशी बांगडीवाली भाभीसोबत (जन्नत बशीर शेख) होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला त्या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाकी दाखवल्यानंतर तिने सर्व काही सांगितले. ही चौकशी सुरू असताना दुसर्‍या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्येही एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या महिलेची कसून चौकशी केली. त्या वेळी तिने गुन्ह्याची कबुली दिली. जन्नत बशीर शेख हिने सांगितले की, रेश्मा सुतार आणि तक्रार करणारी प्रियंका पवार यांच्या संगनमत व कट करून चिमुकल्याचे अपहरण केले. हा मुलगा तुकाराम निंबळे (मावळ) याच्या मध्यस्थीने पनवेल तालुक्यातील बोर्ले गावात राहणार्‍या चंद्रकला माळी आणि भानूदास माळी यांना एक लाख रुपयांना विकला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्याशी संपर्क साधून मोबाईलवरुन फोन लोकेशन हे बोर्ले गाव येत असल्याचे सांगितले. तातडीने दौंडकर यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाळंदे, उपनिरीक्षक गजानन टाकळे, सहाय्यक उपनिरीक्षक मनोहर चव्हाण, नाईक राकेश मोकल, शिपाई भीमराव खताळ यांचे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी पाठवून चंद्रकला माळी आणि भानूदास माळी या दोघांना ताब्यात घेत मुलाबाबत विचारपूस केली. त्यांनी हा मुलगा एक लाख 60 हजार रुपयांना दीपक म्हात्रे यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले व मुलाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि कलम 370, 368, 120 ब, 34 अन्वये गुन्हा दाखल केला तसेच आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत या मुलाला शोधून काढल्याबद्दल पुणे परिमंडळ-3च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक आयुक्त गलांडे यांनी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.

दोन वेळा झाली मुलाची विक्री

पुण्यातील कोथरूड परिसरातून एका चार वर्षीय चिमुरड्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवातही केली, पण या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या मुलाच्या आईनेच एक लाख रुपयांत या मुलाची विक्री केल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नाही तर आईने ज्या व्यक्तीला हा मुलगा विकला होता, त्याने आणखी एका व्यक्तीला त्या मुलाची विक्री केल्याचे समोर आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply