पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
पूर्वी गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी खबर्यांचे जाळे असायचे. आता बदलत्या काळाप्रमाणे सीसीटीव्ही तंत्रज्ञान पोलीस विभागाकरिता अतिशय उपयुक्त ठरत असून, खालापूर येथे लोकसहभागातून सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे, अशी भावना रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी शुक्रवारी (दि. 28) व्यक्त केली.
खालापूर नगरपंचायत आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही संचाचे लोकार्पण शुक्रवारी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण घटले असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.
खालापूर हद्दीत विविध मोक्याच्या 10 ठिकाणी दोन लाख 74 हजार रुपये खर्चून अतिशय सुसज्ज असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी लोकसहभागातून आणि खालापूर नगरपंचायतीच्या सहकार्याने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, चौक येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन देशमुख यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मोलाची मदत केली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांची देखभाल आणि दुरुस्ती खालापूर नगरपंचायत करणार असल्याने एक मोठा भार हलका झाल्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदिश मरागजे यांनी केले. तहसीलदार चप्पलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर, शेखर लवे, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे, पोलीस पाटील राजू केदारी, आनंदा ठोंबरे या वेळी उपस्थित होते.