पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फैलावत चालला असून रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पनवेल महानगरपालिका व संबंधित पोलीस ठाणे यांच्यामार्फत नियम मोडणार्या दुकानांवर व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. नुकतेच कामोठे येथे कामोठे पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर मेघना वाईन्ससमोर ह्युंदाई इऑन या चारचाकीमध्ये संपूर्ण गाडी भरून गुटखा, तंबाखू या पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक महिलांनी पत्रकारांना दिली. त्यानुसार पत्रकारांनी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून या प्रकरणाची माहिती दिली व सत्यता दाखवली. या वेळी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दखल घेऊन गुटखाविक्री करणार्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस अधिकार्यांनी दिले. त्यानुसार संबंधित गाडीत खुलेआम गुटखा विक्री करणार्या व्यक्तीवर कामोठे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, संबंधित गाडी जप्त करण्यात आली आहे.