Breaking News

भाजपा : कार्यकर्त्याच्या क्षमता विकसित करणारा पक्ष

भारतीय राजकारणात भाजपा आणि साम्यवादी पक्ष वगळता अन्य राजकीय पक्षांमध्ये प्रशिक्षणाची स्वतंत्र अशी रचना नाही. पूर्वीचा जनसंघ व नंतरच्या भाजपाने प्रारंभापासूनच ‘कार्यकर्ता’या संकल्पनेला महत्त्व दिले आहे, कारण भाजपाच्या दृष्टीने ‘कार्यकर्ता’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पार्टी संघटन वाढते ते कार्यकर्त्यांच्या भरवशावरच, त्यामुळे पार्टीत येणार्‍या कार्यकर्त्यांची योग्य ती जडणघडण झाली पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यास प्रशिक्षित होणे गरजेचे आहे ही भाजपाची सुरुवातीपासूनची भूमिका राहिली आहे.

भारतीय जनता पार्टीची आज झालेली संघटनात्मक वाढ व क्षमता संवर्धनाचा मार्ग याचे श्रेय द्यायचे झाले तर पार्टीच्या प्रशिक्षणाच्या रचनेस द्यावे लागेल… भारतीय राजकारणात विशेषत: 1990नंतर भाजपाची राष्ट्रीय स्तरावर व अनेक राज्यांमध्ये जसजशी ताकद वाढू लागली तसतशी प्रशिक्षणाची आवश्यकता अधिक भासू लागली. आधुनिक व्यवस्थापनशास्त्राच्या प्रचलित सिद्धांताप्रमाणे आजच्या काळात प्रशिक्षण म्हणजे केवळ प्रशिक्षण कक्षात बसवून विषय शिकवणे नव्हे, तर कार्यकर्त्यांचा सहभाग, आंतरक्रिया, अनुभवांची देवाण-घेवाण यांच्या माध्यमातून त्यांची मानसिक व बौद्धिक क्षमता उंचावण्यास मदत करणे. त्यामुळे राजकारणात मिळणार्‍या व येणार्‍या संधीचे सार्थक होण्यासाठी कार्यकर्त्यांची गुणवत्ता व क्षमतावाढीसाठी त्यांचे प्रशिक्षण घडवून आणणे हा भाजपाचा सुरुवातीपासूनचा एक अजेंडा राहिला आहे. त्यामुळे पार्टीने प्रशिक्षणाची एक शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रचना उभी केली आहे. स्वत:चे प्रशिक्षणाचे एक धोरण ठरविले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून भाजपाने पार्टी विथ डिफरन्स ही एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हा राजकीय सक्रियतेस गुणवत्ता देण्याचा प्रयत्न आहे. भाजपाची प्रशिक्षणाची एक स्वतःची रचना आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण विषयाचा विचार करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण प्रकोष्ठ आहे. या प्रकोष्ठाच्या वतीने पार्टीत वेळोवेळी होणार्‍या प्रशिक्षणाची आखणी होत असते. प्रत्येक राज्यासाठी प्रशिक्षण प्रमुख नियुक्त झाले आहेत. राज्य स्तरावर प्रशिक्षणाचा विचार करण्यासाठी प्रशिक्षण समिती नियुक्त झाली आहे. संघटनेच्या दृष्टीने मंडल, जिल्हा, राज्य व काही विषयांसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण वर्ग योजले जातात.

भाजपाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठीही प्रशिक्षणाची रचना केली जाते. यांत ग्रामपंचायत जिल्हा परिषद, महापालिका सदस्य, आमदार-खासदारांपासून सरकारांमधील मंत्र्यापर्यंत नियमितपणे प्रशिक्षण वर्ग योजण्यात येतात. लोकप्रतिनिधी निवडून येतो तेव्हा त्यास त्याची कर्तव्ये व जबाबदारी काय हे माहीत नसते तो सभागृहात जातो तेव्हा त्यास संसदीय कामाची माहिती नसते. सभागृहात उभे राहिल्यावर प्रश्न कसे विचारावेत, संसदीय आयुधांचा उपयोग कसा करावा याचे अल्प ज्ञान असते. या पार्श्वभूमीवर पार्टीच्या वतीने लोकप्रतिनिधी जेव्हा प्रथमच निवडून येतो त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण वर्ग योजले जातात. लोकप्रतिनिधीला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली तर तो अधिक प्रभावी काम करू शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठीच्या प्रशिक्षणात काही कायदेशीर बाबी (उदा ग्रामपंचायत कायदा, महापालिका कायदा, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे), ग्रामपंचायत, महापालिका किंवा विधिमंडळ कामकाज, आर्थिक अंदाजपत्रक इ. सारखे काही तांत्रिक विषय तसेच मतदारसंघाची जोपासना, सरकारी योजना व लोकसहभाग यांसारख्या व्यावहारिक विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.

भाजप ’प्रशिक्षण’ या विषयाकडे गांभीर्याने बघतो. कार्यकर्ता वा लोकप्रतिनिधींचे एकदा प्रशिक्षण झाले की ते सर्वार्थाने प्रशिक्षित झाले अशी पार्टीची भूमिका नसते. पार्टी असे मानते की,प्रशिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि त्यामुळे प्रशिक्षणाच्या रचनेतून प्रतिवर्षी सर्व कार्यकर्त्यांना जावे लागते. भाजपा एक सर्वात मोठे राजकीय संघटन आहे. त्याची ताकद आहे ती बूथ स्तरावर काम करणारा कार्यकर्ता. एक बूथ आणि 50 युथ (युवक) ही भाजपाची घोषणा आहे. त्यामुळे बूथ स्तरावर काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे मेळावे व प्रशिक्षण पार्टी घडवून आणते. कोणत्याही प्रकारची निवडणूक आली की, निवडणुकीसाठी सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांनी कसे सिद्ध राहिले पाहिजे यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण होत असते. यात निवडणूक व्यवस्थापन, प्रचारतंत्र, सोशल मीडिया, वातावरणनिर्मिती, मतदार संपर्क आदी विषयांचा समावेश असतो.

कोणत्याही प्रकारची निवडणूक आली की, सर्व राजकीय पक्ष छोट्या-छोट्या स्तरांवर प्रशिक्षण योजताना दिसतात, परंतु भाजपाचे वैशिष्ट्य असे की निवडणुकीच्या व्यतिरिक्त पार्टीच्या वतीने सर्व स्तरांवरील कार्यकर्त्यांचे नियमित प्रशिक्षण होत असते. यांत विविध मोर्चे म्हणजे महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, पार्टी प्रवक्ते, किसान मोर्चा, जनजाती मोर्चा पार्टीच्या राज्य कार्यालयांचे प्रमुख इ. पार्टीच्या संघटनात्मक रचनेत जेवढे घटक आहेत त्या सर्वांचे सातत्याने प्रशिक्षण होत असते. प्रत्येक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, दिनक्रम, वक्ते, सत्रांची रचना, वेळ अनुशासन इ. गोष्टींचे प्रामुख्याने पालन होते. प्रशिक्षणाची वेगवेगळी मोड्यूल्स ठरविली आहेत. काही घटकांचे गरजेनुसार प्रशिक्षण होते. प्रशिक्षणास जो अपेक्षित आहे त्याची सूची केली जाते. त्याच्या निवडीचे निकष ठरविले जातात. कार्यक्रमाचे स्थान ठरविले जाते. सामान्यपणे प्रशिक्षण वर्ग हे निवासी असतात. सर्व स्तरांवरील कार्यकर्ते व नेते एकत्र राहतात. वर्गात पूर्णपणे अनुशासन पाळले जाते. कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणातून संस्कार, प्रेरणा व उत्साह घेऊन जावे असा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यास पोषक असे वातावरण, व्यवस्था निर्माण केल्या जातात. निवास भोजन, मंच व्यवस्थापन, संचालन, सभागृह आदी व्यवस्थांकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते.

प्रशिक्षण वर्गात काही सैद्धांतिक विषय, संघटनात्मक व काही माहितीसाठीचे व व्यवस्थापनशास्त्राशी संबंधित विषयांची रचना असते. पार्टीची वैचारिक भूमिका, इतिहास व त्याची वाटचाल संघटनात्मक रचना, कार्यपद्धती, संघटनात्मक उपक्रम, संघटन व सरकार यातील समन्वय, कार्यकर्ता व्यवहार, कार्यालय व्यवस्थापन, इत्यादी विषयांचा समावेश असतो. या व्यतिरिक्त कार्यकर्ता ज्या स्तरावरचा आहे त्याप्रमाणे त्याच्याकडूनच्या अपेक्षा, जबाबदार्‍या इ.ची चर्चा होते. या प्रशिक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पार्टी अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या शीर्षस्थ नेत्यांपासून ते बूथ स्तरावर काम करणार्‍या कार्यकर्त्यापर्यंत सर्व जण सहभागी होतात. स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्व जण या प्रशिक्षण उपक्रमांमधून सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण वर्ग झाल्यानंतर वर्गाचे सिंहावलोकन-व्यवस्था व विषयांचा आढावा घेतला जातो. सहभागींकडूनही अभिप्राय घेतला जातो. या प्रशिक्षणातून भाजपाने स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली विकसित केली आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण म्हटले की, एकतर लोकांना त्याचे आश्चर्य वाटते व कुतूहलही वाटते. भाजपाकडे स्वत:ची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारखी एक प्रशिक्षण संस्था उभी राहिली आहे. संपूर्ण दक्षिण आशियात राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी एकमात्र स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी म्हणून काम करत आहे. कार्यकर्ते प्रशिक्षणाच्या यज्ञात सहभागी होतात. त्यानंतर त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट होण्यास मदत होते, दृष्टिकोन व्यापक होतो. ते सर्व जण काम अधिक समजून घेऊन करतात. जाणिवा प्रगल्भ होतात. सामाजिक प्रश्नांबद्दलची जाणीव, संवेदना निर्माण होते. त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो असा पार्टीचा अनुभव आहे.

प्रशिक्षण हा भाजपाचा स्थायीभाव आहे. कार्यकर्ता मुशीतून घडतो तसे प्रशिक्षणाच्या यज्ञातून गेलेले कार्यकर्ते समाजात प्रभावीपणे काम करू शकतात. पार्टीची सदस्यसंख्या केवळ वाढून चालणार नाही, तर पार्टीची संख्यात्मक व गुणात्मक वाढ झाली पाहिजे म्हणूनच प्रशिक्षणाचा आग्रह पार्टीत धरला जातो. त्यांना खर्‍या अर्थाने सामाजिक प्रश्नांची, राजकारणातील आव्हानांची, देशातील समस्यांची खरी जाण निर्माण होते. तो विकसित होतो, प्रगल्भ होतो. स्वत:चा विकास म्हणजेच पार्टीचा विकास आणि राजकीय पक्ष विकसित होतो म्हणजे मूल्याधिष्ठित राजकारण निर्माण होऊन लोकशाही बळकट होण्यास साहाय्यभूत होते.

विशेष लेख :- रवींद्र माधव साठे,

(लेखक हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply