विक्षिप्तपणामुळे शिक्षक घाबरले
कर्जत : बातमीदार
दहावीच्या परीक्षेचा सोमवारी (दि. 4) शेवटचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर नेरळ विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी (दहावी ड) विक्षिप्तपणा करू लागला, वेडाचे झटके आल्यासारखे वागू लागला. दोन तासांच्या झटापटीनंतर त्या विद्यार्थ्यांला पोलिसांच्या उपस्थितीत पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
नेरळ विद्या मंदिर या शाळेतील 16 वर्षीय विद्यार्थी (रा. नवीन वसाहत शेलू) सोमवारी परीक्षा देत होता. वर्गात निरव शांतता असताना हा 16 वर्षीय विद्यार्थी आरडाओरडा करू लागला, महापुरुषांची नावे घेऊन ही पृथ्वी मी नष्ट करील, सर्वांना मारून टाकेल, असे मोठमोठ्याने बोलू लागला. त्यानंतर तो स्वतःचे कपडे काढू लागला. सुपरव्हीजन करणार्या शिक्षकांनी बाहेर असलेले क्रीडा शिक्षक जयवंत पारधी यांना बोलावून घेतले. त्यांना ढकलून हा विद्यार्थी वर्गाबाहेर पडला. त्याला पकडण्यासाठी आलेल्या एम. के. परदेशी यांच्या तोंडावर या विद्यार्थ्यांने जोरदार फटका मारला. त्यात परदेशी यांचा चष्मा तुटला तसेच त्यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाली.पोलिसांनी या विद्यार्थ्याला पकडून एका वर्गात कोंडून ठेवले. शाळेतून निरोप गेल्याने त्या विद्यार्थ्यांचे पालक तेथे पोहचले. पालकांनी आणलेल्या वाहनामधून दुपारी बाराच्या सुमारास त्या विद्यार्थ्यांला ठाणे येथील रुग्णालयात नेल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.
या प्रकाराने नेरळ विद्या मंदिर शाळेत गोंधळ उडाला होता. शाळेत तब्बल 400 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत होते, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या विद्यार्थ्याकडून असा विक्षिप्तपणा यापूर्वी कधीच झाला नव्हता, अशी माहिती शाळेतील 10ड या वर्गाच्या सर्व शिक्षकांनी दिली.