नवी मुंबई : बातमीदार
स्मारकातील अत्याधुनिक ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय अशा विविध सुविधांतून बाबासाहेबांना खर्या अर्थाने समजून घेता येते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक म्हणजे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक काम असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या जागर 2022 उपक्रमात ’भारतातील प्रबोधनाच्या चळवळी’ या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान देताना ते बोलत होते. डॉ. रावसाहेब कसबे यांनी महाराष्ट्रासह भारतभरातील प्रबोधनाच्या चळवळींचा आढावा घेतला. प्रबोधनाच्या चळवळीने प्रश्न विचारायला शिकविले, त्यामुळे विकासाला गती मिळाली असे सांगत त्यांनी बाबासाहेबांचे सर्वांत मोठे योगदान असलेल्या समतेचे तत्व प्रस्थापित करणार्या भारतीय राज्यघटनेला प्रबोधनाच्या चळवळीचा आधार असल्याचे मत व्यक्त केले. वारकरी परंपरेने समाज प्रबोधनाचे फार मोठे काम केले असल्याचे सांगत त्यांनी तुकारामांच्या अनेक अभंगांचे दाखले दिले.
दक्षिणेमध्ये प्रबोधनाच्या चळवळी मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच दक्षिणेकडील राज्येही पुरोगामी विचारांची राहिली असे स्पष्ट करीत डॉ. रावसाहेब कसबे यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच दक्षिणेकड़ील रामास्वामी पेरियार यांच्या समाज सुधारणा विषयक कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मारक व्हावे या भूमिकेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आगळ्यावेगळ्या पध्दतीने जयंती साजरी व्हावी यादृष्टीने जागर 2022 या विशेष उपक्रमाचे 30 मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत झालेल्या मान्यवरांच्या व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. जागर करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.