Breaking News

तळेगावात पिकण्याआधीच भातशेती सुकली; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणाचा शेतीला फटका

माणगाव : प्रतिनिधी

एक महिन्यापासून कालव्याचे पाणी न मिळाल्याने  माणगाव तालुक्यातील तळेगाव परिसरामधील भातशेती पिकण्याआधीच सुकली आहे. कालव्याला त्वरित पाणी सोडावे, अन्यथा पाटबंधारे विभागाच्या माणगाव येथील कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा तेथील शेतकरी ग्रामस्थांनी दिला आहे. डोलवहाळ बंधार्‍याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यात  उन्हाळी भातशेती केली जाते. यंदा 15 डिसेंबरपासून कालव्याला पाणी सोडण्याचे  पाटबंधारे विभागाने जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र 31 डिसेंबरला कालव्याला सोडले होते. त्यामुळे शेतकर्‍यांत भातपिक घेण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अनेक शेतकर्‍यांनी भातशेती ऐवजी कडधान्य पिकवण्याकडे धाव घेतली. त्यामुळे यंदा माणगाव तालुक्यातील भातपिकाचे क्षेत्र कमी झाले. गेल्या वर्षी माणगाव तालुक्यात सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावर भाताच्या पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र यंदा 98 हेक्टर क्षेत्रावर भातपिक उभे आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी भात बियाणांची पेरणी केली होती. मात्र गेल्या एक महिन्यापासून कालव्याचे पाणी मिळाले नसल्याने तालुक्यातील तळेगाव परिसरामधील भातशेती पिकण्याआधीच सुकली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी व सरपंच निलेश म्हात्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply