पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पदपथ व रस्ते यावर अनधिकृतपणे दुरूस्त होत असलेली वाहने, पडीक, बेवारस वाहनांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 230 व अनुषंगीक कलमान्वये कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी झालेल्या ठरावानुसार एकुण 693 बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. प्रभागनिहाय बेवारस वाहनांवर केलेली कारवाई पुढीलप्रमाणे केली आहे. प्रभाग समिती अ खारघरचे प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी 123 बेवारस वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने स्टिकर लावले आहेत. प्रभाग समिती ब कळंबोलीचे प्रभाग अधिकारी हरिश्चंद्र कडू यांनी त्यांच्या प्रभागातील 381 बेवारस वाहनांवर कारवाई करून स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यापैकी 305 बेवारस वाहने जागेवरून हलविण्यात आली तर 40 बेवारस वाहने उचलली आहेत. पैकी 3 वाहने वाहनमालकांनी दंड भरुन सोडवून नेली आहेत. काही स्टिकर लावलेली वाहने जागेवर उभी आहेत. प्रभाग समिती क कामोठेचे प्रभाग अधिकारी सुरेश गांगरे यांनी त्यांच्या प्रभागातील 179 वेवारस वाहनांना स्टिकर लावण्यात आले असून 30 बेवारस वाहने उचलली आहेत. 4 वाहन चालकांकडून प्रत्येकी 3500 रूपये प्रमाणे 14000 रुपये दंड वसूल करुन ती वाहने सोडून दिली आहेत. प्रभाग समिती ड पनवेलचे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी त्यांच्या प्रभागातील 20 बेवारस वाहने जप्त केली होती त्यापैकी 7 वाहनमालकांनी माफीनामा लिहून दिल्यामुळे ती वाहने सोडुन दिली आहेत. एका वाहनचालकाकडून 3500 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
कारवाईचे स्वरूप होणार तीव्र
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने ही कारवाई सुरू आहे. ही कारवाई आणखी तीव्र स्वरूपात करण्यात येणार असून नागरिकांनी बेवारस वाहने रस्त्यावर सोडून देऊ नयेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.