नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 10 दिवस कोकण विभागात विविध उपक्रमाद्वारे महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग वंदना कोचुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 6 ते 16 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार, कोकण विभागातही पुढील दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. या वेळी कोकण विभागात राबविण्यात येणार्या कार्यक्रमांची रुपरेषा कोकण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी सांगितली. सामाजिक न्याय विभागाने शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनेनुसार, कोकण विभागात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 7 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा. 8 एप्रिल रोजी जिल्ह्यामधील स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण. 9 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात उपक्रम व रक्तदान शिबिर. 10 एप्रिल रोजी विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन तसेच 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. 12 एप्रिल रोजी लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. 13 एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम.14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा. कोकण विभागातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यामार्फत ऑनलाइन जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. 15 एप्रिल रोजी महिला मेळावे तसेच तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 16 एप्रिल रोजी स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.