पनवेल : रामप्रहर वृत्त
शासन परिपत्रकान्वये गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्वे ऑफ इंडिया) मार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करुन जीआयएस प्रणालीवर आधारीत मालमत्ता/मिळकत पत्रक तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार पनवेल तालुक्यातील स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाकरिता गावठाणातील मिळकतींना चुना मार्किंगच्या कामास रविवार
(दि. 10)पासून सुरुवात करण्यात येणार असून सोमवार (दि. 11)पासून कर्नाळा या गावापासून ड्रोनद्वारे गावठाणाचे सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे.
संनियंत्रण अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिलेल्या सूचनेद्वारे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री. सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी, पनवेल यांच्या अध्यक्षेखाली शुक्रवारी (दि. 8) पनवेल पंचायत समिती येथील सभागृहामध्ये गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याबाबत आढावा बैठक झाली.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, गटविकास अधिकारी संजय भोये उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना पनवेल उपअधीक्षक भूमी अभिलेख विजय भालेराव यांनी केली. या योजनेचे लाभ शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल. मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील. मिळकतींचे नेमक क्षेत्र माहित होईल. मालकी हक्काचा अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संरक्षण होईल. गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होतील. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी मिळकत पत्रिका होईल. मिळकत पत्रिका हीींिीं://वळसळींरश्रीरींहरीर.ारहरलर्हीाळ.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरून सहज उपलब्ध होतील.
पनवेल तालुक्यातील स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्वेक्षण हा प्रकल्प ग्रामस्थांसाठी शासनाचा राबविण्यात येणारा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागामुळेच यशस्वी होऊ शकणार आहे, तरी ग्रामस्थांनी 8-अ च्या नोंदी अदयावत करून घ्याव्यात, ग्रामस्थांनी आपल्या स्वतःच्या मिळकतींचे चुन्याच्या सहाय्याने अचूक सीमांकन करावे, ग्रामस्थांनी त्यांचे दूरध्वनी / मोबाइल नंबर व पत्ते ग्रामसेवक अथवा संबंधित पालक कर्मचारी यांना द्यावी. ग्रामस्थांनी या मोहिमेसाठी ग्रामपंचायत व भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी आणि पनवेल उप अधीक्षक भूमी अभिलेख विजय भालेराव यांनी केले आहे.