पनवेल : वार्ताहर
दारूमुक्त असलेले खारघर शहर आता दारू युक्त म्हणून ओळखु लागलेले आहे. खारघर-कोपरा परिसरात अवैध पद्धतीने जोरात दारू विक्री केली जात आहे. कोपरागाव, खारघर गाव, मूर्बीगाव, रांजनपाडा गाव, पेठगाव या सर्व गावामध्ये ठीकठिकाणी बिंधास्तपणे दारू विक्री होत आहे, मात्र यावर कारवाई केली जात नाही.
कोपरा गावात सर्वांत जास्त गावठी दारू विक्री धंदे जोरात चालत आहेत. यावर कोणाचा वरदहस्त आहे हे गुलदस्त्यात आहे. खारघरमध्ये फुटपाथवर राहणारे भिकारी सर्वांत जास्त प्रमाणात असल्याने हे भिकारी, गर्दूल्ले दारू पिण्याकरता कोपरा गावात येत असतात व दारू पिऊन रस्त्यावर कुठे ही पडतात. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दारू विक्रेत्यांचे नाव पोलिसांकडे दिले तर आपले नाव उघड होईल या भीतीने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहेत. या अवैध धंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून या अवैध धंद्यांवर कारवाई करून आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
खारघर-कोपरा परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे. रात्रीच्या वेळी तळीराम बिंधास्त कुठेही बसून दारू पिण्याचा आनंद घेत आहेत. सर्वांच्या नजरेस पडणारे या अवैध धंद्यांकडे पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. या बेकायदेशीर दारू विक्रीवर कोणतीही मोठी कारवाई काही महिन्यांपासून झालेली नाही. अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याने खारघर शहरात अवैध धंद्यांना उधाण आले आहे, परंतु याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.