Breaking News

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा  : पनवेलच्या स्वस्तिका घोषने जिंकले राष्ट्रीय विजेतेपद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक

पनवेल ः प्रतिनिधी
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया व मध्य प्रदेश टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य प्रदेशमध्ये झालेल्या 82व्या ज्युनिअर अ‍ॅण्ड युथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2020 राष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषने अंडर 18 मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले आहे. तिच्या कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन करून कौतुक केले. या वेळी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, स्वस्तिकाचे पालक व प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते.
मध्य प्रदेशमधील अभय प्रशाल इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामन्यात पनवेलच्या स्वस्तिकाने सुहाना सैनीविरुद्ध जादा गुणांवर गेलेला दुसरा गेम गमावला होता, पण त्यानंतर स्वस्तिकाने प्रतिकार करीत 7-11, 11-13, 11-7, 11-4, 11-6, 11-9 अशी बाजी मारली. प्रथमच कुमारी गटात खेळलेल्या स्वस्तिकाने दोन गेम गमावल्यानंतरही दोन्ही कोपर्‍यांतून निर्णायक आक्रमण केले. तिची प्रतिस्पर्धी म्हणून खेळलेल्या सुहाना सैनी नेटजवळ सर्व्हिस करण्यात माहीर असल्याने तिच्याविरोधात खेळताना साहजिकच दडपण होते. खेळताना स्वस्तिका पिछाडीवर गेली, मात्र तिने हार पत्करली नव्हती. त्यामुळेच तिने वेगाने पुढे झुकत सुहानाची सर्व्हिस परतवून लावत तिचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
   खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची ती इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला फ्रान्स येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. हाँगकाँग, स्पेन, जॉर्डन, कोलंबो यांसह इतर देशांमध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले. स्वस्तिकाने लहानपणापासूनच टेबल टेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे. त्यामुळे तिला विराट कोहली फाऊंडेशनकडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.
ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली. स्वास्तिकाचे वडील संदीप घोष या खेळातील प्रशिक्षक व सल्लागार आहेत. ओमान येथे झालेल्या ओमान ओपन स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने पार पडली. त्या वेळी या स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले व पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. स्वस्तिकाने 2013मध्ये गुजरातमध्ये राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.
प्रत्येक वर्षी तिने आपल्या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली.  दोन वर्षांपूर्वी पुणे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेतही स्वस्तिकाने यशस्वी कामगिरी केली. केंद्र शासनाच्या विविध क्रीडा प्रकार असलेल्या ’खेलो इंडिया युथ गेम’ स्पर्धेतही तिने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे  82व्या ज्युनिअर अ‍ॅण्ड युथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2020 राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदाचा किताब जिंकून स्वस्तिका घोषने अंडर 18 मुलींच्या गटात टेबल टेनिस श्रेणीतील ऑल इंडिया रँक 1, तर जागतिक रॅकमध्ये पाचवा क्रमांक कायम राखला आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच विद्यालयाने व प्राचार्य राज अलोनी यांनी स्वस्तिकाच्या प्रगतीसाठी नेहमीच मदतीचा हात दिला. वेळोवेळी मार्गदर्शन करून तिला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. टेबल टेनिसमध्ये स्वस्तिकाने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे मिळविली, पण या स्पर्धेत जिंकलेले राष्ट्रीय चॅम्पियनशिप बहुमोल असून हे पारितोषिक लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाला समर्पित करतो.  
-संदीप घोष, स्वस्तिकाचे पालक व प्रशिक्षक

Check Also

कामोठ्यात आमदार आपल्या दारी!

उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत व्यक्त केले समाधान पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर …

Leave a Reply