Breaking News

कोंढाणे धरणाच्या डीपीआरसाठी सल्लागार सेवा नेमण्यास मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोतर्फे कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथील प्रस्तावित धरण प्रकल्पासाठीचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार सेवा नेमण्यास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

नवी मुंबई क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरात आकारास येत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे या भागातील पाण्याची गरजही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. सिडको नवी मुंबई क्षेत्राची सध्याची पाण्याची गरज 291 एमएलडी असून, विविध पाणीपुरवठा योजनांद्वारे 240 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढत्या पाणीपुरवठ्याची गरज भागवण्यासाठी सिडकोतर्फे हेटवणे, पाताळगंगा, मोरबे, बारवी, बाळगंगा, कोंढाणे, पोशिर या विविध योजनांमधून भविष्यात वाढीव पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. सन 2034नंतर नवी मुंबईची पाण्याची गरज 1275 एमएलडी एवढी असेल, परंतु प्रत्यक्षात 1035 एमएलडी इतक्या पाण्याची तूट भासणार आहे, तसेच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोतर्फे 474 चौमी क्षेत्रावर नैना शहर विकसित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी अतिरिक्त जलस्रोतांची आवश्यकता भासणार आहे. यासाठी सिडकोतर्फे 19 ऑक्टो. 2015च्या पत्रान्वये जलसंपदा विभागास 250 एमएलडी क्षमतेचा कोंढाणे धरण प्रकल्प पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला हस्तांतरित करण्यात यावा याबाबतची मागणी करण्यात आली. त्यानुसार 18 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयान्वये नैना क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी राज्य शासनाच्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे कोंढाणे धरण प्रकल्प सिडकोला जेथे आहे जसे आहे तत्त्वावर हस्तांतरित करण्यात आला. सिडकोने या आधीच प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षण, मृदा परीक्षण आदी प्रारंभिक कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply