पनवेल : रामप्रहर वृत्त
मानसिकता बदला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने आपण जे काम करतोय त्यात सर्वस्व झोकून देऊन कष्ट करा, असा मोलाचा सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच रूसा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात सोमवारी (दि. 11) आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला.
या समारंभाला पनवेलचे आमदार तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे, चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन उज्ज्वल यश संपादित केले आहे अशा विद्यार्थ्यांना या समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विजय जोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात शिकत राहिले पाहिजे. आपले कौशल्य वाढविले पाहिजे. स्वतःला ओळखून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने काम करणे गरजचे आहे. त्याचप्रमाणे एकदा हातातून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे वेळेचा वापर योग्य पद्धतीने करा. लोकांसोबत सकारात्मक संबंध ठेवून संवाद कौशल्य वाढवा. हे आयुष्य जगताना महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
समारंभाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि आयुष्यात अशीच प्रगती करीत राहा, अशा शुभेच्छा दिल्या, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असा महत्त्वाचा सल्ला देऊन त्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …