Breaking News

शेलू रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र उपाययोजना नाही

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू आहे. मात्र हे काम करताना प्रवाशांची कोणतीही सुरक्षा घेतली जात नाही. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी प्रवाशी दिनेश कालेकर यांनी स्थानक प्रबंधकांना भेटून केली आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 1980 च्या दशकात निर्माण केलेल्या शेलू स्थानकात 2004 मध्ये पादचारी पुलाची बांधणी करण्यात आली होती. त्यानंतर या स्थानकात 2021 मध्ये नवीन पुलाची निर्मिती करण्यात आली असून सरकत्या जिन्याचे कामदेखील सुरू आहे. प्रवाशांना पादचारी पुलावर नेण्यासाठी उभारण्यात येणार्‍या लिफ्टचे कामदेखील अंतिम टप्यात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू आहे. त्या पुलाचे सिमेंटच्या पायर्‍या काढून टाकल्या जात आहेत. त्यामुळे पायर्‍यांवर असलेले सिमेंट हे थेट स्थानकात पडत आहे. मात्र दुरुस्तीचे काम सुरू असल्याबाबत कोणत्याही प्रकारचे सूचना फलक  लावण्यात आले नाहीत. त्यामुळे स्थानकात लोकल पकडण्यासाठी जाणार्‍या प्रवाशांच्या अंगावर पादचारी पुलाचे सिमेंट पडत आहे. शेलू रेल्वे स्थानकात दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, मात्र स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. त्याबाबत  प्रवासी दिनेश कालेकर यांनी शेलू रेल्वे स्थानकातील स्थानक प्रबंधकांची भेट घेतली आणि सूचना फलक लावण्याची तसेच दुरुस्तीचे काम सुरू असताना प्रवाशांना  दुखापत होऊ नये यासाठी सुरक्षा विषयक काळजी घेण्याचे आवाहन केले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply