कर्जत : बातमीदार
नेरळ वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालाय ग्रामपंचायतीने 3 फेब्रुवारी 2022 रोजी तोडले होते. परिसरातील आदिवासी बांधवांच्या मागणीनंतर तेथे नव्याने शौचालय उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम आता पूर्ण होत आले आहे. नेरळ वाल्मिकीनगर परिसरात प्रामुख्याने आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहतात. तेथे ग्रामपंचायतीचे सार्वजनिक शौचालय होते. मात्र तेथील एका बिगर आदिवासी व्यक्तीने अर्ज करून हे सार्वजनिक शौचालय तोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामस्थांसाठी पर्यायी व्यवस्था न करता नेरळ ग्रामपंचायतीने हद्दीतील वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालय 3 फेब्रुवारी 2022 रोजी तोडले होते. ग्रामसभेत चर्चा झाल्यानंतर ते सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले, असा खुलासा नेरळ ग्रामपंचायतीने केला आहे. सार्वजनिक शौचालय तोडल्याने वाल्मिकीनगर भागातील 200 हुन अधिक कुटुंबांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी 15 वित्त आयोगाच्या निधीमधून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून या महिन्यात बांधकाम पूर्ण होऊन ते वापरास दिले जाऊ शकते.