विकास समिती देणार प्रशासनाला स्मरणपत्र
कर्जत : बातमीदार
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी कर्जत विकास समितीने सह्यांची मोहीम राबविली. त्यानंतर शहरातील सर्व सरकारी अधिकार्यांना निवेदने दिली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून प्रशासनाकडून संयुक्त बैठकीबाबत चालढकलपणा सुरु आहे. त्यामुळे कर्जत विकास समितीने स्मरणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत शहरातील सर्व रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने वाहनांना आणि पादचार्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी कर्जत विकास समितीने 27 मार्च रोजी सह्यांची मोहीम राबविली. या मोहिमेत हजाराहून अधिक नागरिकांनी वाहतूक कोंडीतून शहराची सुटका करण्याची मागणी केली. या मागणीचे आणि सह्यांचे निवेदन कर्जत विकास समितीच्या वतीने 31 मार्च रोजी कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस ठाणे आणि तहसीलदार यांना देण्यात आले होते. त्या वेळी तहसीलदार विक्रम देशमुख यांनी 4 किंवा 5 एप्रिलला संयुक्त बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र संयुक्त बैठक झाली नाही म्हणून पुन्हा कर्जत विकास समितीचे सदस्य तहसीलदार यांच्याकडे गेले. त्यावेळी 7 एप्रिलला बैठक लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र 11 एप्रिल उजाडले तरी कर्जत शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून बैठक लावली गेली नाही. त्यामुळे आता कर्जत विकास समितीने सर्व शासकीय अधिकार्यांना स्मरणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतूक कोंडीबाबत निर्णय घेणार्या अधिकार्यांची व कर्जत विकास संघर्ष समितीच्या सदस्यांची मिटिंग लवकरात लवकर आयोजित करावी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, असा मजकूर या स्मरणपत्रात आहे.