Breaking News

सशक्त भारतासाठी सशक्त भाजप काळाची गरज

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; पेणमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

पेण ः प्रतिनिधी

जर तुम्हा आम्हाला सशक्त भारत बनवायचा असेल तर त्यासाठी येणार्‍या काळात सशक्त भाजप बनविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे केले.

पेणमध्ये नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 11) करण्यात आले. त्यानंतर जाहीर सभा झाली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्ष नीलिमा पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, अविनाश कोळी, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, महादेव दिवेकर, डी. बी. पाटील, प्रसाद भोईर, प्रातांधिकारी विठ्ठल इमानदार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, मुख्याधिकारी जीवन पाटील, नगररचना अभियंता सुहास कांबळे, प्रशासन अधिकारी राजाराम नरुटे आदी उपस्थित होते.

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाला दिशा देण्याचे काम होत असून देश महासत्तेकडे जाताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत. कोरोनाच्या संकटकाळात जवळजवळ 80 कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचे काम केले गेले. जी-20 परिषदेत आज आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी नेतृत्व करणे अभिमानास्पद आहे. हे सर्व विरोधकांनी डोळे उघडून पाहिले पाहिजे. आपल्या शेजारी असणारे देश पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांची या दोन-अडीच वर्षांमध्ये काय अवस्था झाली आहे, तिथे कशा पद्धतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तिथे असणारे नागरिक हे कसे जीवन व्यतीत करीत आहेत आणि इकडे आपला देश सुजलाम् सुफलाम् होत आहे हे आपल्या देशाला लाभलेल्या खंबीर नेतृत्वामुळे शक्य होत आहे.

पुढे बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी समस्या निवारणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एमएमआरडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी दिला. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. पेण शहराचा विकास झपाट्याने होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासनिधी या सात महिन्यांत देण्यात आला.

मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने कशा प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले हे आपण सर्वजण जाणतो तसेच 2014च्या अगोदर आघाडी सरकार महाराष्ट्राला कसे अधोगतीला घेऊन गेले होते याचे एक उदाहरण म्हणजे जवळजवळ 10 ते 12 तास वीज भारनियमन आपल्या राज्यात सुरू होते, परंतु 2014नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळच्या काळात केलेल्या कामांमुळे आणि नियोजनामुळे नंतरच्या काळातही 24 तास प्रत्येक घरात वीज आहे. सबका साथ सबका विकास या तत्त्वावर आपले हे सरकार चालले असून यापुढेही पेण शहरासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन या वेळी मंत्री चव्हाण यांनी दिले.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, आमदार रविशेठ पाटील यांनी पेण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पावले उचलली असून आता माजी आमदार धैर्यशिल पाटील सोबत आले आहेत. हे आपल्या सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी एक अमृतदायक अशा पद्धतीचे शुभचिन्ह  ठरणार आहे, असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमध्ये सबका साथ सबका विकास हे सूत्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेले हे सरकार सबका विकास राज्य सरकारचा प्रयास जोडून संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी जोमाने कामाला लागले आहे. आता विकासाचा प्रवास सुरू झाला असून हा प्रवास आम्हा सगळ्या रायगड जिल्ह्याच्या लोकांना आनंद देणारा ठरणार आहे.

माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी गेल्या नऊ वर्षांत आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या माध्यमातून काम करीत असताना पेणचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही केले असून यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विकासकामांच्या बाबतीत पेणला नेहमी झुकते माप देणारे आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांचे नेहमी पाठबळ लाभले आहे, असे आवर्जून सांगितले. यापुढेदेखील पेणचा विकास होत राहील, असे अभिवचनही त्यांनी दिले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply