डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
पनवेल ः वार्ताहर
भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या स्वातंत्र्यवीरांचा गौरव महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती महापालिका मोठ्या उत्साहात लोकसहभागातून साजरी होणार आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. 12) निबंध व वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन पीर करमअली मनपा शाळा क्र.10 या ठिकाणी करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला उजाळा दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल आणि नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख करून देत मार्गदर्शन केले. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट आणि खुला एक गट होता. निबंध स्पर्धेत आणि वक्तृत्त्व स्पर्धेत पनवेल महानगरपालिकेच्या 11 शाळांसह याकूब बेग शाळा, सीकेटी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल मार्केट यार्ड येथील शाळांमधील 30 विद्यार्थी सहभागी झाले आहे. त्याचबरोबर खुल्या गटात शहरातील विविध भागातून 16 जणांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. आंबेडकर जयंती दिवशी रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेत सहभाग घेणार्यांनादेखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वेळी शिक्षण विभागातील दशरथ म्हात्रे, आश्पाक काझी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.