रोहे : प्रतिनिधी
शहरासह वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगायत, जंगम, गुरव समाज मोठ्या प्रमाणात रहात असून समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचे दफन करण्यासाठी दफनभूमी नसल्याने समाज बांधवांना नाहक त्रास होत आहे. लिंगायत समाज बांधवांना गाव तिथे दफनभुमी असे शासनाचे परिपत्रक असतानाही शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने लिंगायत समाज बांधवांना दफनभूमी मिळत नाही. रोहा शहर व लगत असलेल्या वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भुवनेश्वर व परिसरात लिंगायत वाणी, लिंगायत कुंभार, लिंगायत जंगम, लिंगायत गुरव यासह अन्य लिंगायत समाजाच्या पोटजातीचे लोक रहातात. या समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांना लिंगायतांच्या विधीनुसार दफन करावे लागते. मात्र येथे दफनभुमी नसल्याने त्यांना मृतदेह दफन करण्यासाठी आपल्या मुळ गावी, अन्य जिल्ह्यांत, अन्य राज्यांत घेवून जावे लागते. त्यासाठी विशेषत: गरीब समाज बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शासनाचे परिपत्रक असतानाही रोहा शहरात व वरसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगायत समाज बांधवाना दफनभूमी मिळत नाही, ही मोठी शोकांतिका असून या महत्त्वाच्या व जिव्हाळ्याचा विषयाकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. यापुढे शासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष न दिल्यास लिंगायत समाज बांधव आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत.