Breaking News

पागोटे सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

आता भाजपचा होणार सरपंच

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामस्थांच्या मतदानाअंती मंजूर झाला आहे. 117 मतांनी भार्गव पाटील यांचा पराभव झाला.
ऑक्टोबर 2017मध्ये भार्गव पाटील हे पागोटे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आले होते, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जनमानसात नाराजीचा सूर उमटू लागला होता. अशातच पागोटे ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी सरपंच पाटील हे मनमानी कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत उरणच्या तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. 28 जानेवारी रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आठ विरुद्ध दोन मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी उरण तहसीदारांमार्फत 9 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचे जाहीर केले होते.
या संदर्भात पागोट्याची ग्रामसभा बोलाविण्यात येऊन प्रत्यक्ष झालेल्या मतदान प्रक्रियेत 909 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  
यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 493, तर विरोधात 376 जणांनी मतदान केले. 40 मतपत्रिका कोर्‍या आढळून आल्याने त्या बाद ठरविण्यात आल्या. अशा प्रकारे सरपंच भार्गव पाटील यांचा 117 मतांनी पराभव झाला असून, ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या बहुमताच्या जोरावर 493 मते मिळवून ठराव जिंकला. अविश्वास ठरावाच्या मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर भाजप व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, पागोटे ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदी विद्यमान उपसरपंच सुमित पाटील यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती पिठासीन अधिकारी तथा उरणचे निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.
पागोटे ग्रामपंचायतीवर आता ‘कमळ’ फुलणार असल्याने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, महालण विभाग अध्यक्ष तथा माजी सरपंच महेश कडू, योगेश पाटील तसेच निलेश पाटील, विद्यमान उपसरपंच सुमित पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पागोटे गावचे ग्रामस्थ, मतदार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply