पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्यात पानिपत झाले. शेकाप हा अलिबाग व पेण मतदारसंघ आपले बालेकिल्ले समजत होता, मात्र तेही ढासळले. आता काही राहिले नाही. तेव्हा पुढे सन्मानाने राजकारण करता यावे म्हणून जयंत पाटील यांनी शेकापचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावे, असा सल्ला काँग्रेसचे नेते व न्यू मेरीटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी रविवारी (दि. 27) पत्रकार परिषदेत दिला.
कामगार नेते घरत पुढे म्हणाले की, अलिबागमधून मुख्यमंत्री बनविण्याची भाषा करणारे शेकाप नेते जयंत पाटील यांना साधी घरची जागा राखता आली नाही. पेणमध्येही शेकापचा पराभव झाला. आघाडीतील काँग्रेस पक्षाला विचारात न घेता अनेक निर्णय पाटील यांनी घेतले. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला. त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवून राहण्यासाठी शेकापला काँग्रेसमध्ये विलीन करावे. येथे त्यांना कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करावे लागणार नाही. शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन केल्यास सुनील तटकरेंच्या अधिपत्याखाली राहून काम करावे लागले. तेव्हा त्यांनी शेकापला काँग्रेसमध्ये विलीन करावे.
पनवेल, उरण, पेण, अलिबागचा वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून, परराज्यातून येथे येणार्या लोकांना शेकाप काय हेच समजावणे कठीण जात आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे शेकापसह आघाडीत असल्याने काँग्रेसचेही खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे दोघांचीही दुकाने बंद होण्याची वेळ आली आहे. तेव्हा राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी शेकापला काँग्रेसमध्ये विलीन करावे, असे स्पष्ट मत घरत यांनी व्यक्त केले.
जयंत पाटील राष्ट्रीय नेत्यांच्या बरोबर बसतात. त्यामुळे ते माझा सल्ला ऐकणार नाहीत, पण मी आंतरराष्ट्रीय नेता आहे. भविष्यात राष्ट्रवादीही काँग्रेसमध्ये विलीन होईल. त्यामुळे शेकापने आताच काँग्रेसमध्ये विलीन व्हावे.
-महेंद्र घरत, काँग्रेस नेते