कर्जत : बातमीदार
माथेरान या पर्यटनस्थळी येणार्या पर्यटकांना माथेरान पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने माहिती केंद्र बनविले आहे. हे माहिती केंद्र बंद असून यामुळे माथेरानमध्ये पहिल्यांदा पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. माथेरान या वाहनांना बंदी असलेल्या पर्यटनस्थळी पर्यटकांना वाहनतळावर उतरल्यानंतर पर्यटनस्थळांची माहिती देणारे पर्यटन माहिती केंद्र माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने सुरु केले आहे. या ठिकाणी पर्यटकांना माहिती देतानाच माथेरानविषयीची चित्रफीतदेखील दाखविली जाते तसेच ध्वनिक्षेपकावरून माहितीदेखील दिली जाते. दस्तुरी नाका येथे पर्यटनाकडून माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वच्छता कर संकलित करण्याचे केंद्रदेखील याच ठिकाणी आहे. पर्यटकांना निसर्गरम्य माथेरान या पर्यटनस्थळाविषयी व इतर योग्य ती माहिती उपलब्ध करून दिली जाते, परंतु सध्या हे प्रवाशी माहिती केंद्र असून नसल्यासारखे बनले आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाने आपले साहित्य ठेवले आहे. हे पर्यटक माहिती केंद्र माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने तत्काळ सुरू करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. पुढील महिन्यापासून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होत आहे. माथेरान पालिकेवर असलेल्या प्रशासकांनी पर्यटक माहिती केंद्र सुरू करून पर्यटकांची माथेरान येथे आल्यानंतर गैरसोय होणार नाही यांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही यादरम्यान होत आहे.