बंगळुरू : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या याही मोसमात अपयशाचा पाढा गिरवावा लागला. 12व्या मोसमात बंगळुरूला 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाणारा तो पहिलाच संघ ठरला. मोठी मोठी नावं असलेले खेळाडू संघात असूनही येणारे अपयश ही बंगळुरूसाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल. त्याचा गांभीर्याने विचार केला जात असून पुढील मोसमात संघात संरचनात्मक बदल करणार असल्याचे संकेत मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी दिले आहेत. त्यांच्या बोलण्याचा रोख हा कोहलीच्या नेतृत्वाकडे असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय संघाने कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे बंगळुरूच्या प्रशिक्षकाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवल्यानंतर बर्याच अपेक्षा लागल्या होत्या. यापूर्वी ते दिल्ली डेअरडेव्हिल्सचे (आताची दिल्ली कॅपिटल्स) प्रशिक्षक होते, परंतु त्यांना तेथे अपयश आले. त्यामुळे कर्स्टन हे पुढील सत्रात बंगळुरूसोबत राहतील याचीही शाश्वती देता येणे कठीण आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्स्टन म्हणाले की, ‘मला कामगिरीत सातत्य राखायला आवडते. त्यामुळे संघबांधणी करताना खेळाडूंची योग्य निवड आणि त्यांचे संघात कायम राहणे महत्त्वाचे आहे. आयपीएलमधील यशस्वी संघ हेच करत आले आहेत आणि बंगुळुरू संघानेही त्यांचा कित्ता गिरवायला हवा. त्यामुळे पुढील वर्षी काही संरचनात्मक बदल केले जातील. पुढील मोसमातही हाच खेळाडूंचा चमू राहिला पाहिजे, त्यांच्यावर विश्वास दाखवणे गरजेचे आहे. संघमालक दरवर्षी संघात बदल करत असतात, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसे घडायला नको. खेळाडूंवर विश्वास दाखवायला हवा.’