Breaking News

पाणी चोरट्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल ; श्रीवर्धन नगर परिषदेचा कारवाईचा बडगा

श्रीवर्धन : प्रतिनिधी

पंप लावून पाणी चोरणार्‍या श्रीवर्धन शहरातील सुमारे पन्नास जणांवर गुन्हे दाखल करुन नगर परिषदेने कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहरातील पाणी चोरांचे धाबेदणाणले आहेत.

श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतून शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवण्यात येते. शहरात काही ठिकाणी थेट जलवाहिनीला विद्युत पंप लावून पाणी चोरी करण्यात येत होती. त्यामुळे या पाणी चोरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत होते. या पाण्याचा साठा करून ते त्याचा गैरवापर करीत होते. मात्र त्यावर श्रीवर्धन नगर परिषदेकडून कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नव्हती. या पाणीचोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. शहरातील काही पाखाडी, वाडी व आळ्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याने तेथील महिला त्रस्त झाल्या होत्या. याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठविल्यावर श्रीवर्धन नगर परिषदेला जाग आली. नगर परिषद कर्मचार्‍यांनी शहरात पाहणी केली. आणि थेट जलवाहिनीला पाणी चोरी होत आहे. त्यावेळी काही ठिकाणी जलवाहिनीला थेट विजपंप लावून पाणी चोरी करण्यात येत असल्याचे आढळले.  नगर परिषद कर्मचार्‍यांनी सुमारे 50 विजेचे पंप जप्त करुन, पाणी चोरट्यांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान, शहरात कोणीही अनाधिकृतरित्या विज पंप लावून, पाण्याची चोरी करून नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन श्रीवर्धन नगर परिषदे तर्फे करण्यात आले आहे.

– नगर परिषदेने पाणी चोरी पकडण्यासाठी कर्मचार्‍यांचे पथक नेमले आहे. पाणी चोरी करतांना कोणी आढळल्यास त्याच्याकडून मागील पुर्ण वर्षाची पाणीपट्टी वसुल केली जाईल. शिवाय त्याच्यावर दंड आकारून कायदेशीर कारवाई केली जाईल.

-वंसत यादव, पाणीपुरवठा सभापती,

श्रीवर्धन नगर परिषद

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply