Breaking News

श्रीवर्धनमध्ये उष्मा वाढला

नागरिक हैराण; पर्यटकांकडून वातानुकूलित खोल्यांना पसंती

श्रीवर्धन : प्रतिनिधी

मागील आठ दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणावर चढलेला पाहायला मिळत आहे. हवेत उष्म्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ढगाळ वातावरण व हवेतील वाढलेली सापेक्ष आर्द्रता यामुळे वातावरणात एक प्रकारचा धुरकट रंग पाहायला मिळत आहे. दमट हवामानामुळे घाम येण्याचा प्रकारदेखील जास्त होत आहे. मागील आठवड्यात 14 एप्रिलपासून सलग सुट्ट्या आल्या होत्या. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर बुकिंग केली होती. परंतु ज्या पर्यटकांनी वातानुकुलित यंत्रणा असलेल्या खोल्यांची बुकिंग केली नव्हती, अशा पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणावर उष्म्याचा त्रास सहन करावा लागला, तर आयत्यावेळी येणारे पर्यटकसुद्धा वातानुकूलित खोलीचीच मागणी रिसॉर्ट किंवा हॉटेलमालकांजवळ करत असल्याचे पाहायला मिळाले. जास्त उष्मा वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे श्रीवर्धन तालुक्यात 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने या ठिकाणची झाडे, झुडपे त्याचप्रमाणे मोठे वृक्ष जमीनदोस्त केले आहेत. त्यामुळे उन्हाचा प्रकोप जमिनीवर जास्त मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी वनखात्याच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवर वीस वर्षापूर्वी सुरूची खूप मोठी लागवड करण्यात आलेली होती, परंतु निसर्ग चक्रीवादळात ही सुरुची सर्व झाडे पडून गेली आहेत. वादळ होऊन दोन वर्षे झाली तरीही वनविभागाकडून त्या ठिकाणी पुन्हा सुरूच्या झाडांची नवीन लागवड करण्यात आलेली नाही. हिरव्यागार असणार्‍या सुरूच्या झाडांमुळे  त्या ठिकाणी बसल्यानंतर थंड हवेचा आस्वाद पर्यटकांना घेता येत असे. पर्यटकांकडून वातानुकूलित खोलीची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

झाडे नष्ट झाल्याने लाही लाही!

श्रीवर्धन तालुक्यात 3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने या ठिकाणची झाडे, झुडपे त्याचप्रमाणे मोठे वृक्ष जमीनदोस्त केली आहेत. हवेत गारवा देणारी ही झाडे नष्ट झाल्याने एप्रिल मे महिन्यात नागरिकावर आता कडक उष्म्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मागील आठ दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यामध्ये पारा मोठ्या प्रमाणावर चढलेला आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply