खोपोली : प्रतिनिधी
शहरातील मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे पायी चालणेदेखील अवघड बनले असून, या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष मूग गिळून असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी सुस्त झाले आहेत.
खालापूर शहरातून जाणारा मुख्य रस्ता जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि वणवे-निंबोडे मार्गे सावरोली-खारपाडा राज्यमार्गाला जोडला गेला आहे. खालापूर शिरवलीवाडी ते वणवे गाव या रस्त्याचे डांबरीकरण गेल्यावर्षी पूर्ण झाले होते. यंदा पावसाळा संपल्यानंतर दांडवाडी ते निंबोडे गाव या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र या रस्त्याचा खालापूर छत्रपती शिवाजी चौक ते घोडवली फाटा हा अर्धा किलोमीटर लांबीचा टप्पा अपूर्ण राहिला आहे. त्यामुळे या अर्धा किमी. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. कायम वर्दळीचा हा रस्ता असून, न्यायालयाची इमारत याच मार्गावर आहे. उर्वरित रस्त्यासाठी निधी उपलब्ध होईल, तेव्हा होईल रस्त्यावर पडलेले खड्डे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवावेत, अशी मागणी खालापूरच्या दिलासा फाउंडेशनने अभियंता प्रशांत राखाडे यांच्याकडे केली होती. त्यावेळी शिल्लक रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळताच काम करण्यात येईल असे उत्तर दिले होते.
दरम्यान, खालापूर छत्रपती शिवाजी चौक ते घोडवली फाटा या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी खालापूरमधील नागरिक करीत आहेत.