Breaking News

भीमरूपी महारूद्रा

पवनसुत हनुमंताचे नाव घेताक्षणी रामभक्तांच्या अंगावर भक्तिभावाने रोमांच उभे राहतात तर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो असे चित्र आता महाराष्ट्रात दिसू लागले आहे. हनुमान चालिसा या स्तोत्राची इतकी नावड शिवसेनेमध्ये कशी उत्पन्न झाली हे आता रहस्य उरलेले नाही.

ज्या पक्षांसोबत शिवसेना सत्तेमध्ये खुर्चीला खुर्ची लावून बसली आहे, त्या पक्षांना हिंदु देवादिकांबद्दल फारशी आस्था नाही हे आजवर अनेकदा दिसले आहे. तथापि सध्या अमरावतीच्या राणा दाम्पत्याने महाविकास आघाडीमध्ये जी घबराट उडवली आहे, त्याने मात्र महाराष्ट्रातील मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशीच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला होता. हे भोंगे उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करून सडेतोड उत्तर देण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालिसाचा कार्यक्रमही उरकला. इतकेच नव्हे तर दादर येथील शिवसेना भवनासमोर टेम्पो उभा करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा वाजवण्याची खोडी काढली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य पाहून शिवसैनिक खवळले नसते तरच नवल. परिणामी, हनुमान चालिसाचे पठण हा अल्पावधीतच लोकप्रिय राजकीय मुद्दा बनला. वास्तविक भोंग्यांच्या प्रश्नी भारतीय जनता पक्षाने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. तरीही राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसा म्हणण्याच्या आग्रहामागे भाजपचाच हात असावा असा संशय महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात घर करून आहे. त्यातच अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली. नुसती घोषणा करून ते थांबले नाहीत. शिवसैनिकांना हुलकावणी देत त्यांनी मुंबईत प्रवेश केला हे कळल्यानंतर शिवसैनिकांचे धाबे दणाणले. हे दाम्पत्य ठरवल्याप्रमाणे खरोखरीच मातोश्रीसमोर प्रकट झाले असते तर शिवसेनेची नाचक्की झाली असती अशी भावना त्यांच्या नेत्यांच्या मनात बळावली आहे. म्हणूनच राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी जाऊन मुंबई पोलिसांनीच ठिय्या मांडला आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. कुठल्याही परिस्थितीत शनिवारच्या पवित्र दिवशी आम्ही मातोश्री येथे जाऊन हनुमान चालिसाचे पठण करणारच असा निर्धार पत्रकार परिषदेत या दाम्पत्याने व्यक्त केला. त्याव्यतिरिक्त त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असे काही टीकास्त्र सोडले की, त्यापेक्षा त्यांनी हनुमानचालिसा वाचला असता तर बरे झाले असते असेच शिवसेना नेत्यांना वाटले असेल. राणा दाम्पत्याचे हे अनोखे आंदोलन दिवसभर प्रसिद्धीमाध्यमांमध्ये गाजत होते. त्यांच्या निर्धारामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्री येथे गर्दी केली. आता पुढील काही दिवस राणा दाम्पत्याला घाबरून मातोश्रीच्या भोवती शिवसैनिकांचा जागता पहारा बसेल हे वेगळे सांगायला नको. खुद्द मुख्यमंत्रीच आपले वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर गेले, इथेच राणा दाम्पत्याने निम्मी राजकीय लढाई जिंकली आहे असे म्हणावे लागेल. आमच्या आंदोलनाशी भाजपचा संबंध जोडू नका असे राणा दाम्पत्याने स्पष्ट केले असले तरी या सार्‍या नाट्याच्या पाठीमागे भाजपचाच हात आहे असे महाविकास आघाडीला वाटते. त्यांची हनुमान चालिसाबद्दलची अनास्था देखील राजकीयच आहे.

Check Also

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर …

Leave a Reply