खोपोली शहर मनसेची मुख्याधिकार्यांकडे मागणी
खोपोली : प्रतिनिधी
खालची खोपोली येथील अग्निशामक दलाजवळ नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे, ही जागा इसार पेट्रोल पंपासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. मात्र तो पेट्रोल पंप महिन्यातून 20 दिवस बंद असतो. त्यामुळे सदरची जागा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ ताब्यात घ्यावी, अशी मागणी खोपोली शहर मनसेच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुर्वी खोपोली शहरातील वाहन मालकांना पेट्रोल भरण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरील शिळफाटा येथे जावे लागत होते. त्यात वेळ आणि आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे खोपोलीकरांच्या मागणीवरून नगरपालिका प्रशासनाने खालची खोपोली येथील जागा इसार पेट्रोल पंपासाठी भाडेतत्त्वावर दिली. पण महिन्यातील वीस दिवस हा पेट्रोल पंप बंद असतो, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. खोपोलीतील वाहन मालकांना पेट्रोल घेण्यासाठी पुन्हा शिळफाटा येथे जावे लागत आहे.
नागरिकांच्या सोईसाठी खालची खोपोली येथील जागा नगरपालिकेने इसार पेट्रोल पंपाला भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र नागरिकांची गैरसोय होऊ लागल्याने सदर पेट्रोल पंपाची जागा नगरपालिका प्रशासनाने ताब्यात घेऊन विकसित करावी व अन्य व्यवसायला ही जागा द्यावी. त्यामुळे नगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा संघटक संजय तन्ना यांनी हे निवेदन खोपोली नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिले. या वेळी मितेश शहा, बाळा दर्गे, संजय दळवी, सतिष येरुणकर इत्यादी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.