Breaking News

पेणजवळ मांडूळ तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील जिते गावच्या हद्दीत मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांडूळ साप व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, आरोपी उत्तम केरू रणशूर (वय 49, रा. मळेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), अजिंक्य रमेश केणी (42, दहिसर), करणा कालाभाई भरवाड (45, दहिसर), विजय दत्तात्रेय म्हात्रे (62, भिवंडी, जि. ठाणे), संजित बळीराम गायकर (30, राजेंद्र नगर, बोरिवली) हे पाच आरोपी त्यांच्या ताब्यात असलेली हुंडाई असेंट कार (एमएच 47-एन 6000)मध्ये पूर्व परवानगीशिवाय मांडूळ प्रजातीचे वन्यजीव विक्री करण्याकरिता नेत असताना पोलिसांनी सोमवारी (दि. 25) दुपारी 3.30च्या सुमारास जिते गावच्या हद्दीत जय अंबे हॉटेल येथे आढळले. या वेळी या आरोपींना फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर भऊड व त्यांच्यासोबत असलेले हवालदार कोकरे यांना धक्काबुकी करून पळून जाण्याचा प्रयत्न करीन सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला.
याबाबत दादर सागरी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 353, वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 9,39 (3), 48(अ),49 (ब) 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक पाटील करीत आहेत. दरम्यान, आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply