पालकमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी
रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 26) रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजल्यानंतर त्या गावांना आता टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही घटना ताजी असताना रोहा तालुक्यातील वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी ‘नळ आले पाईप आले, पाणी कधी येणार, घोटभर पाण्यासाठी जीव किती घेणार‘ अशा घोषणा देत रोहा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. रोहा एसटी स्टँड येथून मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी मोर्चाकर्र्यांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. फिरोज टॉकीज मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. पोलिसांनी प्रवेशद्वारावर मोर्चा अडवला त्यानंतर गावातील प्रमुख मंडळींनी तहसीलदार कविता जाधव यांना निवेदन दिले. गावाला स्वतंत्र जलवाहिनीद्वार पाण्याची व्यवस्था करावी, आमचे पाणी हिरावून घेणार्यांवर कडक कारवाई करावी अशा मागण्या या वेळी ग्रामस्थांनी केल्या.
संदेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात सुशिला गायकवाड, विद्या गायकवाड, सुशील गायकवाड, प्रमोद गायकवाड, विठ्ठल मोरे, योगेश गायकवाड, सुशांत लोखंडे, ज्योती बडेकर, रवि भिलाणे आदीसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर येथील ग्रामस्थांना गेली 10 ते 13 वर्षापासून पाणीटंचाई भेडसावत आहे. पाणीप्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना पत्रव्यवहार केले आहे. मात्र अद्याप पाणीप्रश्न सोडविण्यात आला नाही. गेली 12 वर्षे पाण्यापासून वंचित ठेवणार्या प्रशासना विरोधात आणि पाणीप्रश्न सुटावा यासाठी हा मोर्चा काढावा लागला, असे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.