Breaking News

महाराष्ट्रात फक्त सत्तेचे ‘भोगी’!

राज ठाकरे यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेश सरकारने भोंग्यांच्या आवाजासंदर्भात कारवाई सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय, मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्तेत असणार्‍या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने 30 एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार तेथे 11 हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत, तर 35 हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्री योगी यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचे पालन करण्याचा अधिकार आहे, मात्र त्याचा दुसर्‍यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. भोंगे वापरण्याला हरकत नाही, मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही त्रास होता कामा नये, असे मुख्यमंत्री योगी बैठकीमध्ये म्हणाले होते. यानंतर गृह विभागाच्या अधिकार्‍यांसोबत हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान दोन्ही समाजाच्या धार्मिक नेत्यांनी भोंग्यांचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवली.
योगी सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थलांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार, असे म्हटलेय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!, असं म्हटलंय, तर पोस्टच्या शेवटच्या ओळीत राज यांनी, महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असेही म्हटले आहे.

Check Also

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर; रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी (दि. 18) जाहीर करण्यात आली. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद …

Leave a Reply