Breaking News

खोपोली महोत्सवाचा आयोजक अखेर अटकेत; लहान मुलगा जखमी प्रकरण भोवले

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली महोत्सवातील बुलराईडमध्ये अडकल्याने बारा वर्षाचा रुद्र मोरे हा गंभीर जखमी झाला होता, या प्रकरणात महोत्सवाचे आयोजक  सावंत व बुलराईड ऑपरेटर अशा दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता, चौकशीनंतर अलीकडेच आयोजकाला अटक करण्यात आली आहे. उशिरा का होईना, आयोजक सावंत व एकास अखेर पोलिसांनी अटक केली मात्र त्यांची जामिनावर सुटका झाल्याचे सूत्रांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर पेपको कंपनीच्या मोकळ्या जागेत मुंबईतील आयोजक सावंत यांनी खोपोली महोत्सव आयोजित केला होता. हा महोत्सव पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरला. दररोज सायंकाळी या जागी गर्दी वाढू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यात आल्यामुळे अपघाताची दाट शक्यता वाढली होती, तरीपण या घटनेकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. आयोजकांनी सुरक्षिततेबाबत कुठलीही उपाययोजना केली नव्हती अगदी सोशल मीडियावर या बाबत अनेकांनी ओरड मारल्यानंतर आयोजकांनी एक जुनी रुग्णवाहिका आणून तिथे ठेवली होती. या उत्सवाला परवानगी कुणी दिली, यावरूनच वाद पेटला होता. खोपोली नगर परिषदेचे प्रशासक अनुप दूरे यांनी तर परवानगी दिली नसल्याचे सांगून, हात वर केले होते, या पडद्यामागचे सुत्रधार कोण हे कोणालाच समजत नव्हते. दरम्यानच्या काळात बुलराइट्समध्ये रुद्र मोरे या मुलाचा पाय अडकल्याने गंभीर अपघात झाला होता ,त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. पोलिसांनी या घटनेबाबत पालकांचा तक्रारीवरून आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र कोणालाही अटक झाली नव्हती. अलिकडेच रुग्णालयाचा अहवाल आल्याची माहिती मिळत आहे व आयोजक यास अटक केल्याचे वृत्त आहे. मात्र अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर खोपोली  महोत्सव सुरू ठेवायचा की नाही, यावरून गटबाजी झाली. या घटनांवरून खोपोली महोत्सव हा वादग्रस्त ठरला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply