मनसेचे रोहा पोलिसांना निवेदन
धाटाव : प्रतिनिधी
तालुक्यातील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोहे पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रोहे मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात प्रत्येकाला आपापला धर्म व प्रार्थनेचे स्वातंत्र्य असले तरी यामुळे सर्वसामान्य नागरिक व सार्वजनिक ठिकाणी कोणालाही त्रास होऊ नये अशी सगळ्यांची माफक इच्छा असते. सर्वोच्च न्यायालयाने मशिद, मदरसे, दर्गे यावरील ध्वनिप्रदूषण करणारे अनधिकृत भोंगे हटवावेत असे निर्देश दिले होते. याकरीता न्यायालयाने विशिष्ट वेळेचे बंधन घातले होते. मात्र या नियमांचे काही समुदायांकडून पालन होत नाही. सार्वजनिक हिताच्या या निर्णयावर कारवाई व्हावी, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार रोहे शहर व तालुक्यातील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
रोह्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी मनसेचे जिल्हा सचिव अमोल पेणकर, रोहा तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, शहराध्यक्ष मंगेश रावकर, उपशहराध्यक्ष अमित पवार, महेश वाडकर, रितेश कीर्तने, कुंजन भोकटे, सुरज मुकटे, विकी जाधव, सुमित कांबळे आदी उपस्थित होते.