महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगडावर गुरुवारी (दि.6) 350वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड या वेळी दुमदुमून गेला.
आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी देखील किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. देशभरातून आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज की, जय हा एकच नारा दिला जात असल्याने संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोप वे परिसर दुमदुमून गेला. जिकडे तिकडे हातात घेतलेल्या भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्त दिसून येत होते. पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. गडावर वाजणारे ढोल-ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनीदेखील उठून दाद दिली. यामुळे गडावर शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी वाजत गाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर छत्रपती युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. या वेळी पंच जलकुंभातील पाणी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेक करण्यात आला आणि समोरील शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा एकच जयघोष केला.
या वेळी युवराज संभाजी राजे यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, मनोज जरांगे पाटील, आमदार प्रभाकर देशमुख, आमदार बच्चू कडू, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, संभाजी ब्रिगेड चे प्रवीण दादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी, ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाला आहे त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो. मी आज जो कोणी आहे तो केवळ या छत्रपती शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे, असे स्पष्ट करीत रायगड संवर्धन ही काळाची गरज आहे, असेही स्पष्ट केले. या वेळी युवराज संभाजी राजे यांनी राजकीय भाष्य फार केले नाही. गडकिल्ले हा आपला खरा वारसा आहे तो जतन झालाच पाहिजे, असेही स्पष्ट केले.
या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने लाखो शिवभक्तांच्या सोयीसुविधांसाठी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली होती. किल्ले रायगड तसेच रायगडाचा पायरी मार्ग आणि पाचाड येथे आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सुविधा उभी करण्यात आली होती यामध्ये जवळपास तीन हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. पाचाड येथे तीसहून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध केल्या गेल्या होत्या अशी माहिती डॉ. भाग्यरेखा पाटील आणि डॉ. संध्या रजपूत यांनी दिली.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …