खालापूर ः प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा पवित्र सण खोपोली शहरातील खालची खोपोली व कृष्णानगर येथील मुस्लिम बांधवांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावर्षी सहज सेवा फाऊंडेशन खोपोलीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे रुग्णांना अन्नदान उपक्रमात शिरखुर्मा व जेवण देऊन ईद साजरी करण्यात आली.
रुग्णालयात दाखल असणार्या सर्व रुग्णांना 1 जानेवारीपासून दोन्ही वेळचे जेवण वेळेत पुरवण्याचे महान कार्य अविरत सुरू आहे. अन्नदानासारख्या स्तुत्य उपक्रमाला साथ देताना आम्हाला आनंद वाटत आहे व भविष्यातही आम्ही यात सहभागी होऊ, अशी इच्छा या वेळी खोपोली गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीनभाई शेख व सिद्धांत शेलार यांनी व्यक्त केली.
या वेळी सहज सेवा फाऊंडेशन, खोपोलीचे अध्यक्ष शेखर जांभळे, खजिनदार संतोष गायकर, अल्ताफ सय्यद, निरंजन भोजागोल, रघुनाथ रुठे तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत शेलार, मोहसीन शेख, इम्रान शेख, मोबिन शेख, मकसूद शेख, अहमद शेख, आसिफ शेख, इरफान सय्यद, गुलाब शेख आणि त्यांचे सहकारी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी आपला महत्त्वाचा सण साजरा करीत असताना सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.