नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
उन्हाळी सुट्टीपूर्वी 12 ते 14 वयोगटातील मुलांना किमान पहिली लसमात्रा शंभर टक्के देण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिकेने केले होते मात्र वाढलेला उन्हाचा पारा व लागलेली सुट्टी यामुळे या लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
दरम्यान सुट्टीकाळातही शहरात मुलांची लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने 18 वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसर्या मात्राचे 100 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. 12 ते 14 वयोगटातील लसीकरणासाठी लोकसंख्येच्या 3.15 टक्के म्हणजेच 47,459 एवढे लाभार्थी आहेत. यातील 38490 मुलांना पहिली तर 25021 जणांना दुसरी लसमात्रा देण्यात आली आहे.
नवी मुंबईत 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग सुरुवातीपासून चांगला होता. पालिकेने शहरातील नेरुळ, ऐरोली, वाशी, तुर्भे, तसेच कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो सेंटरबरोबरच शहरातील 211 शाळांमध्ये 12 ते 14 वयोगटातील लसीकरम्णाचे पालिकेने नियोजन केले होते.
या वयोगटातील लसीकरणासाठी पालिकेला अद्याप 97 हजार कोर्बेवॅक्स लस प्राप्त झाल्या आहेत. मात्र आता शाळांना लागलेली उन्हाळी सुट्टी तर दुसरीकडे उन्हाचा चटका याचा परिणाम लसीकरणावर होत आहे.
उन्हाळी सुट्टयांमुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी फिरायला गेल्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शाळा सुरू होत्या तोपर्यंत शाळेत सत्र आयोजित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाने केले होत, असे ठाणे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले.
नवी मुंबई सर्वच वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी चांगली असून मुलांच्या लसीकरणात शाळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही शाळा चांगली मदत करत आहेत परंतु एकीकडे मुलांना लागलेली उन्हाळयाची सुट्टी व दुसरीकडे शहरात असलेला उन्हाचा चटका याचा परिणाम लसीकरण किंचितसे होत असल्याचे दिसून येत आहे.
-डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख