अलिबाग : प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या रॅम्पचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या लिफ्टच्या पॅसेजमध्ये पावसाच्या कालावधीत पाणी साठते. त्यामुळे लिफ्ट बंद ठेवावी लागते. पावसाळ्यात रॅम्प नसेल आणि लिफ्ट बंद राहिल्यास रुग्णांना पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर जाताना त्रास सहन करावा लागतो. कोरोना कालावधीमध्ये आरोग्य व्यवस्थेसाठी अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये विविध सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. तसेच शवागृहाची झालेली दुरावस्था, इमारतीचा तोडण्यात आलेला रॅम्प, इमारतीला पडलेला खासगी वाहनांचा विळखा अशा विविध समस्येने जिल्हा रुग्णालय ग्रासले आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. रॅम्प मुख्य इमारतीशी जोडलेला आहे. त्यामुळे तो तोडताना काळजीपूर्वक काम करावे लागते. तसेच संपूर्ण नवीन रॅम्पचे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागामार्फत करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजीव डोंगरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला टेकू लावण्यात आले होते. इमारत केव्हाही कोसळण्याची स्थिती असल्याने रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नव्याने इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती.