Breaking News

रस्ता पूर्ववत करण्यासाठी कर्जत बेडीसगावमधील आदिवासींचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अलिबाग, कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

गावातील वहिवाटीचा रस्ता काही लोकांनी जेसीबी लावून उखडून टाकला आहे. तो रस्ता पूर्ववत करून मिळावा, या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील बेडीसगाव व आसपासच्या नऊ वाड्यांमधील आदिवासी  सोमवारपासून (दि. 9) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कर्जत तालुक्यातील बेडीसगावातून रस्ता जातो. हा रस्ता नऊ आदिवासी वाड्यांना जोडतो. मागील 40  वर्षांपासून हा वहिवाटीचा रस्ता आहे. रायगड जिल्हा परिषदेने हा रस्ता बांधून दिला आहे. परंतु वांगणी येथील अमोल शेलार व त्याच्या काही सथिदारांनी हा रस्ता जेसीबी लावून उखडून टाकला आहे. त्यामुळे नऊ आदिवासीवाड्यांचा संपर्क तुटला आहे. हा रस्ता उखडत असताना काही आदिवासींनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देऊनदेखील कोणतीही करवाई करण्यात आलेली नाही. उखडलेला रस्ता पुर्ववत करून द्यावा, या साठी काही दिवसांपुर्वी कर्जत तहसीलदार कार्यालयासमोर बेडीसगाव ग्रामस्थानी उपोषण केले होते. त्यावेळी रस्ता पुर्ववत करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु रस्ता अजून बनवण्यात आलेला नाही, असे आदिवासींनी दिलेलेल्या निवेदनात म्हटले आहे. बेडीसगाव गावात जाणारा हा प्रमुख वहिवाटीचा रस्ता आहे. तरीदेखील तो उखडण्यात आला आहे. आता हा रस्ता दुसरीकडून वळविण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र हा उखडलेला रस्ता पूर्ववत करून मिळावा. रस्ता इतर मार्गाने  वळवू नये,  अशी या आदिवासींची मागणी आहे. या मागणीची तड लावण्यासाठी कर्जत आदिवासी सेवा संघाचे जिल्हा सचिव गणेश पारधी, कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी, ग्रामपंचायत सदस्य मंगल पारधी याच्यासह बेडीसगाव ग्रामस्थांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेडीसगाव येथून 200 हून आदिवासी बांधव अलिबाग येथे पोहचले आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply