खारघर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास शासनाने मान्यता दिली असुन या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात रेव्हून्यू शेअरिंग बेसीसवर ठेकेदाराची नियुक्ती करून पाच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.
महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रदूषणमुक्त वाहनांना चालना देण्याच्या दृष्टीने हे धोरण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. पालिकेने आखलेल्या धोरणात पालिकेच्या (अ,ब,क,ड) या चार प्रभागात जागा निश्चित झाल्यानंतर रेव्हून्यू शेअरिंग बेसीसवर ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. याकरिता निविदा काढण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारून निर्माण होणार्या उत्पानातून किती टक्के उत्पन्न महानगरपालिकेस देणार याकरिता नऊ वर्ष कालावधिकरिता व समाधानकारक वाटल्यास पुढील तीन वर्षांकरिता ई-निविदा मागविण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार आहे.
पालिका उपलब्ध करून देणार असलेल्या चार्जिंग स्टेशनच्या भूखंडावर एका वेळेस किमान दोन चारचाकी गाड्या, तीन दुचाकी गाड्या चार्जिंग होती अशा प्रकारच्या व्यवस्थेची तरतूद करण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशनच्या भूखंडावरील इतर मोकळी जागा भाडेतत्वावर देऊन त्या जागेवर अल्पोपहार गृह, टायर पंक्चरचे दुकान तसेच इतर सुविधा उभारण्यात येणार आहेत जेणे करून वाहने चार्जिंग करण्याच्या वेळेस संबंधित वाहन चालकांना स्नॅक्स अथवा इतर खाद्यपदार्थांची सोय उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. हा प्रस्ताव मान्यता मिळण्यासाठी महासभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक वाहनांबाबत शासनाने धोरण आखले आहे. त्या धोरणाची अंमलबजावणी तसेच पालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहन धारकांची सोय व्हावी यादृष्टीने पालिका क्षेत्रात पाच चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या स्टेशनवर अतिरिक्त सोयी सुविधा उभारण्याचा आमचा मानस आहे. -गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
पनवेल परिवहन क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात 30 मार्च 2022 पर्यंत एकुण 1355 खाजगी व 25 व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 235 कार, 1118 एम सायकल/स्कुटर, दोन मोटारयाईज सायकल, सहा ई रिक्षा, नऊ मोटार कॅब, 10 थ्री व्हीलर आदींचा समावेश आहे.