Breaking News

महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाली ः प्रतिनिधी

सध्या कोकणवासीय चाकरमान्यांची गावी जाण्याची लगबग आहे. त्याचबरोबर पर्यटकदेखील कोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात निघाले आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. सलग जोडून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक, नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शनिवारी (दि. 17) जिल्ह्यातील महामार्गांवर वाहतूक कोंडी दिसून आली. याचा फटका प्रवासी आणि वाहनचालकांना बसला. उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटनस्थळे विशेषत: समुद्रकिनारे व जलाशयाची ठिकाणे बहरली आहेत. तेथे धम्माल करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागलेत. अशातच शनिवार रविवार व सोमवारी बुद्धपौर्णिमेची सुटी जोडून आल्याने मुंबई, पुणे व इतर शहर, उपनगरांतून सुटी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटक, चाकरमान्यांना शनिवारी वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूरजवळ शनिवारी सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोकण तसेच गोव्याकडे जाणार्‍या वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. कडक ऊन आणि त्यात वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले होते, तर वाहतूक कोंडी सोडविताना पोलीस यंत्रणेची दमछाक झाली.  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरदेखील वाहतूक कोंडी होऊन वाहनांचा वेग मंदावला. खालापूर टोलनाका आणि बोरघाटात दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एक्स्प्रेस वेने प्रवास करणार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply