पनवेल : प्रतिनिधी
मराठी विज्ञान परिषदेने ‘वेध 2035’ ही ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या परीक्षेसाठी लिखित मजकूर, व्हिडीओ व्याख्याने, प्रयोगांचे व्हिडीओ, विज्ञान-कोडी, कूट-प्रश्न, विज्ञान-खेळ अशी भरपूर अभ्यास-सामग्री पुरवली जाईल. यासाठीची प्रवेश प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ऑनलाइन शालेय विज्ञान परीक्षेचे हे दुसरे वर्ष आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि खगोलविज्ञान या विषयांवरील अभ्यास-सामग्री दर 15 दिवसांच्या अंतराने चार टप्प्यांमध्ये संकेतस्थळावर उपलब्ध होईल. आठहून अधिक शिक्षणतज्ज्ञ-शास्त्रज्ञांनी याचे विकसन केले आहे. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी सराव चाचणी असेल. या चार टप्प्यांनंतर 10 दिवसांच्या कालावधीत परीक्षा होईल. सहावी-सातवीसाठी प्रथमा परीक्षा आणि आठवी-नववीसाठी द्वितीया परीक्षा; मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांतून होईल. प्रत्येक परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या येणार्या विद्यार्थ्यांस दुर्बीण, द्विनेत्री, सूक्ष्मदर्शी यासारखी पारितोषिके आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांस प्रशस्तीपत्रेही मिळणार आहेत. 19 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाईल आणि राष्ट्रीय विज्ञानदिनी पारितोषिक वितरण होईल. परीक्षेसाठी https://mavipa.org/vedh2035 या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.