पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांची महायुती पनवेलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जात आहे. पनवेलचा विकास महायुतीने मोठ्या प्रमाणात केला असून नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येणार्या काळातही अनेक महत्त्वाची विकासकामे नियोजित असून त्यासाठी महायुती सज्ज आहे, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 14 ते 20 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत व्यक्त केले.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले की, महायुतीने समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत विकासाची कामे केली आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगून 10 वेळा निवडणुका झाल्या तरी पनवेलमध्ये भाजप महायुतीच जिंकणार, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच येणार्या तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने सध्या मोठी आघाडी घेतली आहे. नवीन पनवेलमधील या सभेत मतदारांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला.
या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, जितेंद्र म्हात्रे, प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार संतोष शेट्टी, समीर ठाकूर, राजश्री वावेकर, कविता किशोर चौतमोल, तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार अस्मिता जगदीश घरत, शिवानी सुनील घरत यांसह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper